सातारा - लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपारिक शाही विवाह सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. मंदिरात मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पद्धतीने विधीपुर्वक करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान मंदिर संस्थानने दिली आहे.
दर वर्षी तुलसी विवाह दिनाला सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न होत असतो. यंदा हा विवाह सोहळा गुरुवारी रात्री बारा वाजता सालकरी पुरोहित व मंदिराचे पुजारी व मानकरी यांच्या मोजक्याच उपस्थितीत पार पाडणार आहे. या सोहळ्याला भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येण्यास मनाई आहे. मंदिराचे सर्व दरवाजे बंद करून पोलिस बंदोबस्तात हा सोहळा होईल. कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून योग्य ती काळजी घेण्यासाठी सरकारने ही पावले उचलली आहेत.
हेही वाचा-मराठा विद्यार्थी आरक्षणाविनाच; रखडलेल्या शैक्षणिक प्रवेशाला होणार सुरुवात
परगावातील भाविकांनी न येण्याचे देवस्थानचे आवाहन
रुवारी दिवसभर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल. परगावच्या भाविकांनी या दिवशी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये, देवस्थानने आवाहन केले आहे. म्हसवड शहर व परिसरातील भाविकांनी मंदिर व मंदीर परिसरात न येता सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बाहेरगावच्या व स्थानिक भाविकांनी याची नोंद घेऊन सरकार व मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन सिध्दनाथ देवस्थानकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा-कार्तिकी एकादशी : उपमुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाच्या महापूजेचा मान वर्ध्याच्या भोयर दाम्पत्याला
रथयात्रा आयोजनाचा निर्णय अद्याप अनिश्चित-
रथयात्रा १५ डिसेंबरला नेहमीप्रमाणे होणार की नाही, याबाबत भाविक संभ्रमात आहेत. मात्र यावर सरकार काय निर्णय घेईल त्यानुसार कार्यवाही होईल, असेही देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले.
आठ महिन्यानंतर मंदिरे झाली खुली-
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून राज्यभरात बंद असलेली मंदिरे तसेच धार्मिक स्थळे राज्य सरकारने 16 नोव्हेंबरपासून काही अटी व शर्ती आखून देत भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत. असे असले तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता आहे. कार्तिक एकादशीला राज्यातील बहुतांश मंदिरांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येणार आहे.