सातारा - सातारा व पुणे जिल्ह्यातील महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करत लुटणार्या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे.
हेही वाचा - फलटणजवळ जुगार अड्ड्यावर छाप्यात सात जण ताब्यात; १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त
टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने (रा. राजापूर, ता. खटाव), (18 गुन्हे दाखल), सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर (रा. चौधरवाडी, ता. फलटण), प्रथमेश उर्फ सोनू हनुमंत मदने (रा. उपळवे, ता. फलटण), महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (रा. मोती चौक फलटण) (21 गुन्हे दाखल), किरण मदने (रा. राजापूर ता. खटाव) याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. यापैकी किरण मदने याचा पोलीस शोध घेत आहेत.
मारहाण करत महिलेस लुटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी एकच्या सुमारास एक महिला तिच्या मित्राबरोबर वीर धरणावर फिरायला गेली होती. तेथे दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मारहाण करत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन, कानातील सोन्याचा टॉप्सचा एक जोड, मोबाईल हॅण्डसेट व तक्रारकर्त्याच्या मित्राच्या हातातील मोबाईल हॅण्डसेट, असा एकूण 40 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.
फलटण पोलिसांच्या सापडले तावडीत
याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यामधील आरोपी फलटण तालुक्यातील घाटात पोलिसांना मिळून आले. चौकशीत आरोपींनी वीर धरणपात्रालगत गप्पा मारत असलेल्या जोडप्यास लुटले असल्याची कबुली दिली व लुटलेला मुद्देमाल काढून दिला.
अनेक ठिकाणच्या गुन्ह्यांत सहभाग
अधिक तपासात टोळीतील आरोपींनी संघटितपणे फलटण ग्रामीण, फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर, सातारा तालुका, महाबळेश्वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा, तसेच पुणे जिल्ह्यात बारामती तालुका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महामार्गावर व इतर जोडरस्त्यांवरून प्रवासी दुकाचीस्वार व महिला प्रवासी, जोडपे यांच्यावर पाळत ठेवून पाठलाग करत वाटमारी केल्याचे निष्पन्न झाले.
टोळीप्रमुखाला दुसर्यांदा ‘मोक्का’
या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण 1999 अन्वये मोक्का लावण्यात आला आहे. टोळी प्रमुख योगेश बाजीराव मदने व महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (वय 25) याच्यावर यापूर्वी देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. ते नुकतेच जेलमधून सुटले होते. आता दुसऱ्यांदा मोक्काची कारवाई करून पोलिसांनी त्यांना चांगलेच जेरीस आणले आहे.
हेही वाचा - कोयना धरण परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के