सातारा - Maratha Reservation Protest - मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाने चक्री उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. या उपोषणात 200 गावे सहभागी होणार (Maratha Reservation Hunger Strike) आहेत.
गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या - मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देऊन सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. तसेच मराठा बांधवांची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे. मात्र, या समाजाला गेली अनेक वर्षे आरक्षणाचे केवळ गाजर दाखवून झुलवत ठेवले आहे. अंतरावली सराटी गावात मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करावे, अशी मागणीही केली आहे.
संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळावे - केवळ मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखल्याचे आश्वासन देऊन मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येते. ते कसे देता येईल, हे आम्ही दाखवून देऊ, असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सरकारला दिले आहे. एकदा सर्वच आरक्षणाच्या लोकसंख्येची शहानिशा व्हावी, अशी मागणीही केली आहे.
आमची लढाई हक्कासाठी - आरक्षण हा आमचा हक्क आहे. त्यासाठीच आमची लढाई आहे. पोलीस अथवा प्रशासनाशी आमची लढाई नसून शासनाशी आहे. कराड तालुक्यातील 200 गावातील लोक चक्री उपोषणात सहभागी होतील. तरीही न्याय मिळाला नाही तर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. त्यातून होणार्या परिणामास शासन, प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
हिंदू एकतासह रिपाइंचा पाठिंबा - हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, आरपीआयच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला हजेरी लावली. आरक्षणाच्या मागणीला त्यांनी पाठिंबा जाहीर केला.
हेही वाचा -
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; जरांगे पाटील आंदोलन मागे घेणार?
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उमरगा तालुक्यात युवकाची आत्महत्या? संतप्त लोकांकडून टायर पेटवत सरकार विरोधात घोषणाबाजी
- Maratha Reservation: खरंच मराठा समाजाला राज्य सरकार आरक्षण देऊ शकतं का? कायदेतज्ञ काय म्हणतात...