सातारा Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शहाजी दांडगे तसंच ज्ञानेश्वर गुंड (पंढरपूर) या दोन मराठा तरुणांनी स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं पत्र, आज खासदार उदयनराजे भोसले यांना दिलंय. यावेळी उदयनराजे भोसलेंनी त्यांच्या तळमळीचं कौतुक केलंय. तसंच दर दहा वर्षांनी जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. जोपर्यंत जनगणना होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी सरकारला सुनावलं आहे.
तेढ निर्माण केल्यास उद्रेक होणारच : आज या तरूणांनी रक्तानं पत्र लिहिलं आहे. समाजात तेढ निर्माण केल्यास उद्रेक होणारच असं मत भोसले यांनी यावेळी मांडलं. आरक्षण प्रश्नाचं राजकारण करत असला तर मग जनगणना होत नाही, तोपर्यंत निवडणुकही घेऊ नका. सगळ्या जातीतील लोकांना न्याय द्या. केवळ एक विशिष्ट जात पकडून चालू नका, असा सल्लाही उदयनराजेंनी राज्य सरकारला दिलाय.
अन्यथा मतदार पायाखाली घेतील : स्वत:च्या राजकीय महत्वकांक्षेसाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयातून हे आणलं ते आणलं, असं सांगणं योग्य नाही. लोकशाहीत मतदार राजा असतो. त्याला सन्मानानं वागवा. अन्यथा तुम्हाला ते पायाखाली घ्यायला मागं, पुढं पाहणार नाहीत. आरक्षण प्रश्नावरुन आत्महत्या होत असेल, तर याला सरकारचं जबाबदार असेल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
वादविवादा ऐवजी विचार करा : आरक्षण प्रश्नावर वादविवाद करण्यापेक्षा विचार करण्याचा सल्ला उदयनराजेंनी दिला. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. लोक सरकारकडं अपेक्षेनं बघत आहेत. नागरिकांनी सरकारवर विश्वास ठेवलाय. त्यावर सरकारनं खरं उतरणं गरजेचं असल्याचं मत उदयनराजे यांनी व्यक्त केलंय.
दर दहा वर्षांनी जनगणना व्हावी : तुम्ही जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उदयनराजेंनी भुजबळांचा नामोल्लेख टाळून केला. दर दहा वर्षांनी जनगणना झाली पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं पाहिजे. प्रत्येकानं स्वत:ला वंचित म्हणायचं, पण तुम्हाला वंचित ठेवलं कुणी? असा सवालही उदयनराजेंनी केला.
हेही वाचा -