सातारा - साताऱ्याजवळील महादरेच्या जंगलाला फुलपाखरांचे जंगल म्हणून अनोखी ओळख मिळणार आहे. या जंगलाला फुलपाखरु संवर्धन राखीवचा दर्जा मिळणार आहे. यवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यंत पसरलेल्या 108 हेक्टर वनक्षेत्राचा प्रस्ताव मंजूरीसाठी कोल्हापूर प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्याच्या हालचालींनी वेग आला आहे.
ग्रामस्थांशी साधला संवाद -
सातारा वनविभागाच्या वनक्षेत्रपाल शितल राठोड यांनी नुकतेच ग्रामस्थांशी संवाद साधत वनविभागाच्या भविष्यकालीन योजनांची माहिती दिली. गावातील मंदिरात झालेल्या या बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी वनविभागाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. हा प्रस्ताव कोल्हापूर मुख्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार असल्याचे शितल राठोड यांनी सांगितले.
काय आहे महादऱ्यात -
पश्चिम घाटात 360 प्रजातींपैकी 160 प्रजातीची फुलपाखरे एकट्या महादरेत आढळतात. त्यातील 'ऑर्किड टिट' आणि 'व्हाईट टिप्ड लाईन ब्ल्यू' ही दोन फुलपाखरे शेड्युल 1 मधील असल्याचे माजी मानद वन्यजीवरक्षक व पर्यावरणाचे अभ्यासक सुनील भोईटे यांनी सांगितले. महादरे येथील जैवविविधता अलौकिक आहे. तो 'इको टोन' आहे. दोन वेगवेगळ्या परिसंस्था किंवा दोन वेगवेगळे अधिवास एकत्र येतात, त्याची सीमा म्हणजे महादरे परिसर. पश्चिम घाट आणि पूर्वेस दख्खन पठार यांचा मिलाफ म्हणजे महादरे जंगल आबहे. त्यामुळे त्याला इको टोन संबोधले जाते, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिकांच्या जनजीवनवर परिणाम नाही -
विशेष म्हणजे या दर्जामुळे स्थानिक रहिवाशांवर कोणताही परिणाम होणार नाही. संवर्धित राखीव क्षेत्र हे फक्त आणि फक्त वनविभागाच्या जमिनीवरच करता येते. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे खाजगी जमिनीचा समावेश केला जात नाही. त्यामुळे विस्थापन, पुनर्वसन असे कोणतेही प्रश्न उद्भवत नाही. अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देताना खाजगी क्षेत्रही संपादित केले जाते. त्यामुळे स्थानिकांच्या व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित होतो. याठिकाणी कोणतेही खाजगी क्षेत्र संपादीत करावे लागत नसल्याने स्थानिकांचे जनजीवन किंवा त्यांच्या हक्कावर गदा येत नसल्याचे साताऱ्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी स्पष्ट केले.
महादरे होणार नवे पर्यटनस्थळ -
बिबट्यापासून फुलपाखरांपर्यंत वन्यजीवांचा मुक्त विहार, निम सदाहरित जंगल, बारमाही झरे, शिवाय बिबट्या, रानडुकरे, गवे, मोर, वैशिष्ट्यपूर्ण चिमनी आदींचा मुक्त वावर महादरेत आहे. कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमेट बेन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले, याठिकाणी केंद्र व राज्याकडून मिळणाऱ्या निधीतून वन्यजीवांसाठी पाणवठे व कुरण क्षेत्राची निर्मिती, पर्यटकांसाठी इतिहासकालीन पायऱ्या व पायवाटांचा विकास करण्यात येईल. टेहळनी मनोरे, माहिती केंद्र आदी कामे करता येतील. सातारा शहराच्या हद्दीवर हे जंगल असल्याने पर्यटकांसाठी हे ठिकाण पर्यटन केंद्र होईल.
हेही वाचा - छत्रपती शिवरायांना जाती-पातीत, जन्मस्थळांमध्ये अडकवू नका - प्रवीण दरेकर