महाबळेश्वर( सातारा)-कोरोनाच्या महामारी मध्ये लागू असलेल्या संचारबंदी काळात जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला पेरणीसाठी अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. बियाणे व खते खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी कृषी विभाग, महाबळेश्वर यांच्याकडून बियाणे व खते वाटप करण्यात आले.
महाबळेश्वरचे तालुका कृषी अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या सूचनेनुसार स्मार्ट ग्राम पांगारी येथे उपविभागीय अधिकारी वाई कवडे यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिगच्या नियमांचे पालन करुन दुर्गम भागात शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर बियाणे व खतांचे कृषी सेवा केंद्र यांच्या मदतीने वाटप करण्यात आले.
बळीराजाला शेताच्या बांधावर सेवा देण्याचं जे काम तालुका कृषी विभागामार्फत केल जात आहे, त्याच कौतुक करून पांगरीच्या सरपंचांनी धन्यवाद दिले तसेच पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
तालुका कृषी विभाग प्रत्येक गावात ही सेवा शेतकरी गट व कृषी सेवा केंद्रामार्फत देणार असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली. बियाणे व खते वाटप कार्यक्रमाचे आभार महेंद्र पांगारे यांनी मानले.