कराड (सातारा) - कराडमधील ढेबेवाडी फाट्यावर गावठी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तुले, चार मॅगझीन आणि तीस जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. शुभम ढवळे (रा. आगाशिवनगर-मलकापूर, ता. कराड), असे संशयीताचे नाव आहे.
कराडच्या ढेबेवाडी फाट्यावर एकजण पिस्तुले आणि काडसुते विकण्यासाठी येणार असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना खबर्याने दिली होती. त्यांनी कराड परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढेबेवाडी फाट्यावर सापळा लावला. तेथे त्यांना एक युवक संशयितरित्या फिरताना आढळला. संशयावरून पोलिसांनी त्याला हटकले असता पोलिसांना हुलकावणी देऊन तो पळू लागला. यानंतर पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले आहे.
हेही वाचा - अजित पवारांनीच केला शरद पवारांचा गेम - निलेश राणे
संशयिताची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल, हातातील पिशवीत दुसरे पिस्तुल आणि चार मॅगझीन तसेच पॅन्टच्या खिशात 30 जिवंत काडतुसे सापडली. पिस्तुले, मॅगझीन, काडतुसे आणि मोबाईल, असा 1 लाख 37 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक मोहन नाचण, शरद येवले, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा - गृहमंत्र्यांनी पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार इतिहासात प्रथमच - देवेंद्र फडणवीस