सातारा : कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे कोयनेतून विसर्ग थांबवला आहे. जून महिना संपत आला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा निच्चांकी पातळीकडे चालला आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर बनली आहे. यापुर्वी जून महिन्यात १९९६ मध्ये ६१८.३६३ मीटर आणि २०१९ मध्ये ६१८.४६५ मीटर इतकी कमालीची पाणी पातळी खालावली होती.
विसर्ग बंद, पाणी कपात सुरू : कोयना धरणातून पुर्वेकडील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी पायथा वीजगृहातून सुरू असलेला विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कराड, सांगली भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. कराड शहरात पंधरा मिनिटांची पाणी कपात करण्यात आली आहे. कोयनेतील वीजनिर्मितीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पाण्याचे अभूतपूर्व संकट : पावसाने ओढ दिल्याने यंदा पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणातील पाणी पातळी निच्चांकी पातळीकडे वाटचाल करीत आहे. मागील वर्षी याच दिवशी (दि. २४ जून) धरणातील पाणी पातळी ६२१.७९२ मीटर आणि पाणीसाठा १४.१६ टीएमसी होता. पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग देखील सुरू होता.
कोयनेतील पाण्याच्या ऐतिहासिक नोंदी : पावसाअभावी यंदा कोयना धरणातील पाणीसाठा ऐतिहासिक पातळीकडे खालावत चालला आहे. यापुर्वी १९९६ मध्ये १८ जून रोजी धरणातील पाण्याची पातळी ६१८.३६३ मीटर आणि पाणीसाठा १०.६६ टीएमसी होता. २०१९ मध्ये २६ जून रोजी पाणी पातळी ६१८.४६५ मीटर आणि पाणीसाठा १०.७५ टीएमसी होता. मागील वर्षी देखील २४ जूनपर्यंत पाऊस नव्हता. परंतु, १४.१६ टीएमसी पाणी शिल्लक होते.
पाणी उपशावर बंदी : कोयना धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रातील उपसा सिंचन योजनांना पाणी उपसा बंदी करण्यात आली आहे. पिण्याच्या पाणी उपशावर अद्याप बंदी नाही. मात्र, नगरपालिकांनी पाणी कपात सुरू केली आहे. त्यामुळे पाण्याचे अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे.
हेही वाचा -