सातारा - अतिवृष्टीमुळे पुणे विभागात सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पंचनाम्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून शेतकर्यांनी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन देखील म्हैसेकर यांनी केले.
हेही वाचा - आताची परिस्थिती भाजपच्या 'नालायक'पणामुळे - विजय वडेट्टीवार
डॉ. म्हैसेकर यांनी शनिवारी कराड तालुक्यातील नांदलापूर, नारायणवाडी आणि मलकापूरमधील पीक नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत विभागीय उपायुक्त प्रताप जाधव, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे होते.
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला असता सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानीची तीव्रताही वाढू शकते, असेही ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना पाचही जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांना केली आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनीही संयुक्तपणे पंचनामे करण्याचे सूचित केले आहे. पंचनाम्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असेही डॉ. म्हैसेकर यांनी म्हटले आहे.