सातारा: नूडल्स वाहतुकीच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणार्या ट्रकवर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत गोवा बनावटीचा 60 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर मालखेड (ता. कराड) हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. नूडल्स वाहतुकीची पावती दाखवून दारूची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.
भरारी पथकाची कारवाई: नूडल्सची वाहतूक करत असल्याची पावती दाखवून ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जात होती. पुणे-बंगळुरू महामार्गावर मालखेड (ता. कराड) हद्दीत उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एक मालट्रकच्या चालकाने नूडल्सची वाहतूक करत असल्याची पावती दाखवली. मात्र, अधिकार्यांना संशय आल्याने ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आढळले.
दारूची तस्करी रोखण्यात यश : ट्रकमध्ये मद्याचे बॉक्स आढळून आल्यानंतर उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांनी चौकशी केली असता गोवा येथून दारूचे बॉक्स नाशिकला घेऊन जात असल्याची माहिती ट्रक चालकाने दिली. त्यामुळे गोवा बनावटीच्या दारूची तस्करी सुरू असल्याचा प्रकार समोर आला. अधिकार्यांनी साठ लाखांच्या गोवा बनावटीच्या मद्यासह वाहन जप्त करुन चालकास ताब्यात घेतले. पुणे-बंगळुरू महामार्गावरून सातत्याने दारूची चोरटी वाहतूक होत असते. उत्पादन शुल्क विभागाने अखेर मोठी कारवाई करत दारू तस्करांना हिसका दाखवला आहे.
अवैध दारूचा महापूर: सातारा जिल्ह्यात सध्या अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात टपरीवजा शेड टाकून दारू विक्री केली जात आहे. स्थानिक पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला देखील त्याची खबर आहे. मात्र, चिरिमिरी घेऊन अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष केले जाते. कोरेगाव तालुक्यात महिलांनी अवैध दारू अड्डा उध्दवस्त करून विक्रेत्याला चोप दिला होता. त्यानंतर उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला.
कार्यवाही होणार का? गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक करताना सापडल्यास मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती. आता त्यांच्याच जिल्ह्यात गोवा बनावटीची 60 लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील संशयितावर मोक्का अंतर्गत कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.