कराड (सातारा) - कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक परिसरामध्ये बिबट्याने कुत्र्याची शिकार केली असून, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेलवडे बुद्रुक गावातील महेश बाळासो मोहिते यांचे शेरी परिसरामध्ये घर आहे. घराबाहेर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. शनिवारी सकाळी सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना बिबट्याने रात्री घरासमोर झोपलेल्या कुत्र्याची शिकार केल्याचे त्यांंना आढळून आले. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला कळवण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहाणी केली असता, त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे देखील आढळून आले आहेत.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
ऊस गळीत हंगाम संपला असून, उसाचे पीक कमी झाले आहे. त्यामुळे बिबट्यांना लपायला जागा राहिलेली नाही. गावानजीकच्या डोंगर परिसरात बिबट्यांचा वावर आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी याच परिसरातील काले गावच्या शिवारातील घरात बिबट्या घुसल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - उरणमध्ये खवैय्यांना कोरोनाचा विसर; मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी