सातारा - शहर हद्दीवर दाट झाडी आहे. काही निसर्ग निरीक्षक कॅमेरा लावून जंगलाचे निरीक्षण करत होते. त्यावेळी त्यांना एका बिबट्याची हालचाल दिसली. कॅमेरा झुम करुन पाहिले असता दुसराही बिबट्या आढळला. दोघांच्यात खेळ चालला होता. बऱ्याच उशिरानंतर दोघेही दाट झाडीत पसार झाले. या बिबट्यांचे चलचित्रण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून स्थळ व इतर तपशिलाविषयी या ठिकाणी गोपनियता राखण्यात येत आहे.
सातारा शहर व परिसर निसर्गसमृद्ध आहे. या शहराला वाघ, बिबट्या या मांजरकुळातील वन्यजिवांचे दिर्घ काळापासून सानिध्य लाभले आहे. साताऱ्यात, शनिवार पेठेतील 'वाघाची नळी' या ठिकाणी ब्रिटिशपुर्व काळात वाघ पाणी प्यायला यायचा, असे जुने-जाणते लोक सांगतात. मंगळवार पेठेत, चिपळूणकर बागेच्या पाठीमागे एक विहिर आहे. त्याही ठिकाणी पुर्वी वाघ पाणी प्यायला येत होता, अशी नोंद आढळते.
अजिंक्यतारा किल्ल्याच्या पुर्वेस २००१च्या सुमारास दोन बछड्यांसह मादीचे दर्शन झाले होते. बरेच दिवस त्यांचे येथे वास्तव्य असावे. त्यानंतरही शहराच्या हद्दीवर विविध ठिकाणी बिबट्या दर्शन देत होता; आजही देत आहे. यवतेश्वरचा एकमेव अपवाद वगळता गेल्या २५ वर्षांत बिबट्याने माणसावर हल्ला केल्याची घटना नाही.
सातारा परिसर निसर्गसमृद्ध आहे. लपण्यासाठी वनराई, नैसर्गिक तसेच वनविभागाचे कृत्रिम पाणवठे, पुरेसे खाद्य, मर्यादीत मानवी हस्तक्षेप आदींमुळे सातारा परिसर बिबट्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. बिबट्यांचा येथील रहिवास सातारकरांसाठी भूषणावह आहे. नागरिक तसेच वन्यजीव परस्पर जीवनात हस्तक्षेप करत नसल्याने मानव-वन्यजीव संघर्ष येथे टाळण्याला पोषक वातावरण तयार होत आहे.