सातारा - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दरोड्या प्रकरणी ६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या टोळीकडून सोने, चांदी, आणि मोबाईलसह १४ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या टोळीने सातारा आणि सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ३ दरोड्यासह ८५ घरफोड्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जावेद अनिल काळे (रा.फडतरवाडी), करण काळे (रा.भांडेवाडी), निकाल लत्या काळे (रा.कोकराळे), संकेत अलिशा काळे (रा.सिध्देश्वर कुरोली), अभिजित मंज्या शिंदे (रा.सिध्देश्वर कुरोली), ऋतुराज भावज्या शिंदे (रा.काटकरवाडी, सर्व. ता,खटाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मागील दोन महिन्यांपूर्वी वडूज आणि खटाव या परिसरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. या दरोड्यांमुळे सातारा पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. एलसीबीचे पथक या घटनांचा पाठपुरावा करत होते. यावेळी एका संशयित आरोपीला पकडल्यानंतर त्याने दरोड्याची कबुली दिली. एलसीबी पथकाने अधिक चौकशी केल्यानंतर संशयिताने आतापर्यंत केलेल्या तब्बल ८५ घरफोडी आणि दरोडे टाकल्याची खळबळजनक माहिती दिली. दरोडा आणि घरफोड्यांमध्ये सहभागी इतर साथीदारांची नावेही संशयिताने सांगितली आहेत. साथीदारांची नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांची उचलबांगडी केली.
सर्व संशयितांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करत असताना सुमारे २०१६ पासून सातारा जिल्ह्यातील औंध, वडूज, पुसेगाव, कोरेगाव, रहिमतपूर, म्हसवड, दहिवडी यासह सांगली जिल्ह्यातील विटा येथे दरोडा आणि घरफोड्या केल्याची कबुली सर्व संशयितांनी दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनाही याची माहिती देण्यात आली.