सातारा - कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढत आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मिती व पूर्वेकडे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असले तरी अवघ्या 24 तासात धरणातील पाणीसाठ्यात 2.18 टीएमसीने तर पाणी उंचीत 3.5 फुटाने वाढ झाली आहे. धरणात आता उपलब्ध पाणीसाठा 39.45 टीएमसी इतका झाला आहे.
कोयना धरणातील कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी बहुतांशी ठिकाणी सध्या अपेक्षीत पाऊस पडत असल्याने सध्या धरणांतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढतच चालले आहे. येथे सध्या प्रतिसेकंद सरासरी 28 हजार 491 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. दुसरीकडे पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी पाणीवापर सुरूच आहे. त्याचवेळी पूर्वेकडे धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 184 क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तरीही अवघ्या चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात 2.18 टीएमसीने वाढ झाली असून पाणी उंचीतही 3.5 फुटाने वाढ झाली आहे.
धरणाची सध्याची एकूण स्थिती पहाता येथे एकूण पाणीसाठा 39.86 टीएमसी आहे. यापैकी उपयुक्त साठा 34.86 टीएमसी, पाणी उंची 2093.09 फूट, जलपातळी 637.97 मिटर इतकी झाली आहे.
24 तासात झालेला पाऊस
कोयना 92 मिलीमीटर, नवजा 151, महाबळेश्वर येथे 124 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद होणाऱ्या पाथरपुंज 79 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर कोयना पाणलोट क्षेत्रातील प्रतापगड 21, सोनाट 44, वळवण 103, बामणोली 52, काठी 32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.