सातारा - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सॅनिटायझरला मागणी वाढली असून बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाढीव दराने याची विक्री होत आहे. म्हणून रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यात तयार झालेले सॅनिटायझर सभासदांना मोफत घरपोच दिले जाणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॅन्ड वॉश, साबण अथवा हॅन्ड सॅनिटायझरने नियमितपणे हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. मात्र, सॅनिटायझरची प्रचंड मागणी वाढल्याने बाजारात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत साखर कारखान्यांनी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन शासनाने केले होते.
हेही वाचा -कोरोनाच्या लढ्यात भारताची नेपाळ, मालदीवला वैद्यकीय मदत
शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याची तयारी दर्शवून शासनाकडे परवानगी मागितली होती. त्याला अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सॅनिटायझरचे उत्पादन घेण्यासाठी कृष्णा कारखान्याने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार तयार करण्यात येणारे सॅनिटायझर लवकरच बाजारात उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच कारखान्याच्या ४० हजार सभासदांना ते मोफत आणि घरपोच केले जातील, असेही डॉ. सुरेश भोसले यांनी स्पष्ट केले.