छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - न्याय मिळत नसल्यानं कन्नड तालुक्यातील दिव्यांगानं आत्महत्येचं ( farmer commits suicide) टोकाचं पाऊल उचललं. कुटुंबीयांना न्याय देण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह तहसील आवारात नेला. प्रशासनाचे आश्वासन दिल्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आले आहेत. कन्नड तालुक्यातील नेवपुर येथील घटना आहे. त्रिंबक धोत्रे असं या दिव्यांग शेतकऱ्याचं नाव आहे.
रविवारी (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी प्रहार अपंग संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत दिव्यांगांचं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये त्रिंबक धोत्रे या दिव्यांगानंदेखील सहभाग घेतला होता. परंतु आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची राज्य सरकारकडून दखल घेण्यात येत नाही. तसेच महाराष्ट्र बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊ शकत नाही, अशा निराशेमध्ये या दिव्यांग शेतकऱ्यानं पैठणमध्ये आत्महत्या केली. यानंतर दिव्यांगांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, सदरील दिव्यांगाची संपूर्ण कर्जमाफी करावी, विशेष बाब म्हणून घरकुल देण्यात यावे, शेतकरी आत्महत्या म्हणून सर्व योजना मिळाव्यात, अशी प्रहार अपंग संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मागण्या केल्या आहेत. या मागणीसाठी त्यांना त्र्यंबक धोत्रे यांचा मृतदेह तहसील कार्यालय आवारात आणला होता.
ऑडिओ क्लिप तयार करून संपवले जीवन- प्रहार संघटनेच्या दाव्यानुसार दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी होत नाही. दिव्यांगांना घरकुल निळत नाही. दिव्यांगांची कर्जमाफी होत नाही. दिव्यांग शेतकऱ्यानं सुसाईड नोट लिहून तसेच व्हॉइस रेकॉर्डिंग करून पैठणमध्ये २७ जानेवारी रोजी आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी पोलिसांना त्याबाबत इशारा दिला होता. अचानक त्रिंबक धोत्रे गायब असल्यानं पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, सोमवारी त्यांचा मृतदेह जायकवाडी जलाशयात आढळून आला. या प्रकरणी मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी २८ जानेवारी दुपारी धोत्रे यांचा मृतदेह थेट कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात आणला होता. या प्रकारानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, संबंधितांच्या मागण्या मान्य करून त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय दिला जाईल, असे आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर वातावरण निवळले. पोलीस बंदोबस्तात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.