कराड (सातारा) - मुंबई अग्निशमन दलात विभागीय अधिकारी असलेल्या कराड तालुक्यातील साकुर्डी गावचे सुपूत्र कृष्णत यादव यांचा स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान झाला. 2019 मध्ये सांगलीतील महापुरावेळी मदतीसाठी आलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाचे नेतृत्व त्यांनी केले होते.
हेही वाचा - साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी 15 ऑगस्ट 1947 या दिवसाच्या सांगितल्या आठवणी, म्हणाले..
16 जुलै 2020 रोजी मुंबईतील फोर्ट भागात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या 27 जणांची सुटका करताना त्यांनी स्वत:च्या जिवाची बाजी लावली होती. या शौर्याबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना अग्निशमन सेवा शौर्य पदक जाहीर झाले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते त्यांना स्वातंत्र्यदिनी शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीत घेतले शिक्षण
कृष्णत यादव यांचे पहिले ते सातवीपर्यंतचे शिक्षण साकुर्डी (ता. कराड) या मूळगावातील जीवन विद्या मंदिरमध्ये झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी वसंतगड (ता. कराड) येथील व्ही. जी. माने हायस्कूलमध्ये, तर कराडच्या यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहून बीएससी पदवी घेतली. 16 मार्च 1993 रोजी मुंबई अग्निशमन दलात सहाय्यक केंद्र अधिकारी म्हणून ते भरती झाले.
सर्च अँड रेस्क्यू, फ्लड अँड रेस्क्यू टीमचे केले नेतृत्व
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्यालय असलेल्या भायखळा अग्निशमन केंद्रात ते सहाय्यक केंद्र अधिकारी म्हणून भरती झाले. 2019 साली सांगली येथे आलेल्या महापुरात मुंबई अग्निशमन दलाचे पथक धावून आले. त्या पथकाचे नेतृत्व कृष्णत यादव यांनी केले होते. गेल्या 28 वर्षांच्या सेवेत आपत्ती काळात त्यांनी अनेक जबाबदार्या पार पाडल्या.
मुंबईच्या फोर्ट भागातील रेस्क्यू ऑपरेशनची शासनाकडून दखल
मुंबईतील फोर्ट भागात 16 जुलै 2020 रोजी दुपारी भानुशाली इमारतीचा भाग कोसळल्याने ढिगार्याखाली रहिवासी गाडले गेले होते. इमारतीचा उर्वरित भाग आणि छत धोकादायक अवस्थेत लटकत होते. त्या ठिकाणी पोहचून कृष्णत यादव यांनी जिवाची पर्वा न करता 27 जणांची सुटका केली होती. मुंबई अग्निशमन दलातील अन्य अधिकारी व कर्मचार्यांनी देखील धाडसी कामगिरी केली होती. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले. त्यामध्ये अग्निशमन दलाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे, अग्निशमन अधिकारी हेमंत परब, विभागीय अग्निशमन अधिकारी कृष्णत यादव, आत्माराम मिश्रा, केंद्र अधिकारी अनिल पवार, बाळासाहेब राठोड यांचा समावेश आहे.
साकुर्डीच्या ग्रामसभेत अभिनंदनाचा ठराव
कराड तालुक्यातील साकुर्डी ग्रामस्थांसाठी रविवारी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि गावाच्या सुपूत्राला जाहीर झालेले राष्ट्रपती शौर्य पदक, असा दुग्धशर्करा योग होता. यानिमित्ताने साकुर्डी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी ध्वजारोहणानंतरच्या ग्रामसभेत कृष्णत यादव यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला. तसेच, कृष्णत यादव यांनी गावाच्या सार्वत्रिक कामासाठी अर्थसहाय्य करून विकासाला हातभार लावल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
हेही वाचा - कुस्तीचा जादूगार : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव मरणोत्तर पद्म पुरस्कारापासून वंचित