कराड (सातारा) - महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने आज सायंकाळी पाच वाजता शंभर टीएमसीचा टप्पा पार केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राज्यातील उद्योगविश्वाला मोठा दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. धरणात प्रतिसेकंद 1234 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा - कोयना धरणात आज सायंकाळी 100.6 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे आवकही बंद होती. तसेच धरणाचे वक्र दरवाजे आणि पायथा वीज गृहातील विसर्ग देखील काही दिवसांपूर्वी बंद केलेला आहे. परतीचा पाऊस काळ लक्षात घेऊन धरण व्यवस्थापनाने पाणीपातळी नियंत्रित ठेवली होती. अखेर आज पाणीसाठ्याने शंभरी गाठली.
पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली - कोयना धरणातील पाण्यावर तयार होणारी वीज राज्यातील उद्योगांना पुरवली जाते. तसेच पिण्याच्या पाण्यासह पूर्वेकडील सिंचनाची गरज देखील पूर्ण केली जाते. धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोयनानगर येथे 13 मिलीमीटर, नवजा येथे 18 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणी पातळी 658 मीटर झाली आहे.