सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात परतीचा मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कोयना धरण ओहरफ्लो झाले आहे. कोयना धरणाच्या भिंतीवरुन पाणी वाहत आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, कोयना जलाशयातील पाणीपातळी नियंत्रित राखण्यासाठी धरणातून यावर्षी तब्बल 6 वेळा वक्र दरवाजे उचलून पाणी सोडण्यात आले आहे.
हेही वाचा- शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर
यावर्षी कोयना धरण परिसरातील पावसाने नवे विक्रम केले. 1 जूनपासून आजपर्यंत कोयनानगर येथे 7 हजार 84, नवजा येथे 8 हजार 196 आणि महाबळेश्वर येथे 7 हजार 149 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सद्या धरण परिसरात परतीच्या पावसाने कहर केला आहे. कोयना धरणाच्या भिंतीवरुन पाणी वाहत आहे. धरणात सद्या 105.3 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 2 हजार 267 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. कोयना धरण व्यवस्थापणाच्या चांगल्या नियोजनामुळे यावर्षी धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वर्षभराचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. तर महाराष्ट्रावरील विजेचे संकटही दूर झाले आहे.