सातारा: जिल्ह्यातील नऊ बाजार समितीच्या निवडणुकांची सध्या रणधुमाळी सुरू आहे. कराड बाजार समितीची सत्ता कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. सत्ताधाऱ्यांचे स्व. लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनेल विरूद्ध माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनेलद्वारे सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे. एका अर्थाने कॉंग्रेसच्या पॅनेलविरोधात पुन्हा एकदा महाआघाडी तयार झाली आहे.
उमेदवारीवरून विरोधकांमध्ये घमासान: सत्ताधाऱ्यांविरोधात एकवटलेल्या शेतकरी विकास पॅनेलमध्ये उमेदवारीवरून घमासान पाहायला मिळाले. माजी सहकार मंत्र्यांचे बंधू, माजी आमदारांच्या दोन्ही मुलांनी भरलेले अर्ज, भाजपमधून नेहमीच्याच चेहऱ्यांना मिळालेल्या उमेदवारीवर त्यांच्याच समर्थक इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. या सर्व घडामोडींनंतर माजी सहकार मंत्र्यांचे बंधू जयंत पाटील यांची उमेदवारी शेवटच्या दिवशी मागे घेण्यात आली. तथापि, कृष्णाकाठावरील भाजपच्या मातब्बरांचे अर्ज रिंगणात राहिल्याने भोसले गटातच नाराजीचा सूर आहे.
माजी मुख्यमंत्री प्रचारात: बदलत्या राजकारणात प्रत्येक निवडणूक राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची बनली आहे. त्यामुळे सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीने होताना दिसत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारात थेट सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांची संस्था राजकीय भक्ष्य होऊ देऊ नका, असे आवाहन करत त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपवर हल्ला चढवला आहे.
विलासकाकांच्या पश्चात पहिली निवडणूक: कराड बाजार समितीवर चाळीस वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांचे एकहाती वर्चस्व होते. त्याला शह देण्यासाठी २००८ मध्ये सर्व विरोधक एकत्र आले होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधकांना सत्तांतर करण्यात यश आले. मात्र, पुढच्याच निवडणुकीत उंडाळकरांच्या गटाने पुन्हा सत्ता मिळवली. आताच्या निवडणुकीत सताधाऱ्यांनी विलासकाकांच्या नावाने पॅनेल उभे केले आहे.
उदयनराजेंची स्वाभिमानी संघटनेला साथ: सातारा बाजार समिती दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना शह देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ दिल्यामुळे निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे. एकूण १८ जागा असणाऱ्या बाजार समितीवर आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाची ३० वर्षांपासून सत्ता आहे. या सत्तेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला खासदार उदयनराजेंची साथ आणि पाठिंबा मिळाला आहे.