कराड (सातारा) - झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या 'लागिर झालं जी' या मालिकेतील 'जिजी' अर्थात कमल ठोके यांचे काल अल्पशा आजाराने बंगळुरूत निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी कराड येथे येणार असून कराडमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कमल ठोके या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्यांनी कराड तालुक्यातील वसंतगड, सैदापूर, गोवारे अशा अनेक गावांमध्ये शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. नोकरी करत असतानाच त्या नाटकातही काम करत होत्या. तसेच, त्यांना गायनाचीही आवड होती. झी मराठी वाहिनीवरील 'लागिर झालं जी' या मालिकेतील नायक आज्याच्या आज्जीची भूमिका त्यांनी साकारली होती.
मालिका संपल्यानंतर त्या बंगळुरूस्थित आपल्या मुलाकडे राहात होत्या. काही दिवसांपूर्वी त्या आजारी पडल्या आणि शनिवारी (१४ नोव्हेंबर) त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी कराड येथे येणार आहे. त्यांच्यावर कराडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. मनव (ता. कराड) हे कमल ठोके यांचे माहेर, तर कराडमधील शुक्रवार पेठ हे त्यांचे सासर होते. त्यांच्या निधनामुळे मालिका क्षेत्रातील कलाकारांसह शिक्षण क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - नरक चतुर्दशीच्या पहाटे २०० दुर्गप्रेमी सज्जनगडावर दाखल; उत्साहात दीपोत्सव साजरा