सातारा : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेवच्या काळूबाई यात्रेला ( Kalubai Yatra of Mandhardeva ) शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. त्यामुळे राज्यातील तसेच परराज्यातील भाविकांनी यात्रेला मोठ्या संख्येने गर्दी केली. नवसाला पावणारी देवी, अशी काळूबाईची ख्याती आहे. काळूबाची यात्रा ( Kalubai Devi Yatra ) १० दिवस चालते. मागील दोन वर्ष कोरोनामुळे यात्रा भरली नव्हती. प्रशासनाच्या निर्बंधांमुळे अंधश्रद्धेचे प्रकार बंद झाले आहेत. भाविकांनी यात्रेत मास्कचा वापर करण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. ( Kalubai Yatra Started In Satara )
जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते शासकीय पूजा : मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे ( Chief District and Sessions Judge Mangala Dhote ) यांच्या हस्ते पहाटे प्रमुख काळूबाईची शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ, वाईचे तहसिलदार रणजित भोसले आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी खंडाळा तालुक्यातील विंग गावच्या राहूल कदम व रोशनी कदम या दाम्पत्याला भाविकांच्या वतीने शासकीय पूजेचा मान मिळाला. त्याबद्दल कदम दाम्पत्याने मांढरदेवी ट्रस्टचे आभार मानले.
आदिमाया पार्वतीचे रूप : मांढरदेव गडावरील श्रीकाळेश्वरी तथा काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला भरते. तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक वर्षभर मांढरदेवला येत असतात. तसेच मांढरदेव देवस्थानाला पैसे आणि दागिने दान करतात.
पौष पौर्णिमेला लाख्यासुराचा वध : द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासूराचा सेनापती मांढव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. यज्ञ कार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांढव्य ऋषींनी तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले. महादेवाने पार्वतीची उपासना करण्यास सांगितले. त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन देवी पार्वती दैत्याचा संहार करण्यासाठी काळूबाईचा अवतार घेऊन मांढरगडावर आली. पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि मांढरगडावर स्थानापन्न झाली, अशी काळूबाई देवीची आख्यायिका सांगितली जाते.
काळूबाईला सोन्याची आभूषणे : भाविकांकडून काळूबाई देवीच्या चरणी रोख रकमेसह दागिन्यांच्या स्वरूपात मोठे दान केले जाते. काळूबाई मंदीराच्या या खजिन्याचे व्यवस्थापन मांढरदेव देवस्थान ट्रस्टकडे आहे. ट्रस्टच्या वतीने देवीला ६८२ ग्रॅम सोन्याचा मुखवटा आणि १७ तोळे वजनाचे नवीन दागिने ट्रस्टच्या करण्यात आले आहेत. भाविकांनी दिलेलं सोन्याचे दान वितळवून ही आभूषणे तयार करण्यात आली आहेत.