सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभे असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य आपण करत आहोत हे निश्चितच अभिमानास्पद आहे, असे उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जम्बो कोविड सेंटरच्या ऑनलाइन उद्धघाटनाप्रसंगी काढले.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या कोविड हॉस्पिटलचे ऑनलाईन उद्धघाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी ऑनलाईनवर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे (ऑनलाईन), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मास्क वापरणे, हातधुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्याला या प्रादुर्भावापासून दूर ठेऊ, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अवघ्या 20 दिवसात अतिशय चांगल्या सुविधा असलेले कोविड हॉस्पिटल उभं केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. देशात लाट ओसरली म्हणता म्हणता दुसरी कोरोनाची लाट आल्याचे उदाहरण असल्यामुळे आपल्याला अधिक सजग राहून काम करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
डॉक्टर आणि नर्सेस यांची सेवा अधिक गतीने होण्याची गरज असून, मृत्यू दर कमी करण्याबरोबर अधिकाधिक ट्रेसिंग करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, शंभुराज देसाई यांचीही भाषणं झाली.
जिल्ह्यासाठी 45.59 कोटींचा निधी
खासगी हॉस्पिटलच्या एक लाखाच्या पुढच्या बिलाचे ऑडिट करावे, त्यावर लक्ष ठेऊन राहा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे विभागाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनेसाठी 151 कोटी दिले असून, पाच जिल्ह्यापैकी सातारा जिल्ह्याला 45.59 कोटी रुपये दिल्याची घोषणाही त्यांनी केली.