कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे जवान लेह-लडाख सीमेवर तैनात होते. कित्येक दिवसांनी अवघ्या दोन महिन्यांची रजा त्यांना मिळाली होती. पण, सीमेवर तणाव वाढला आणि महिनाभरातच त्यांची रजा रद्द झाली. तातडीने हजर होण्याचा आदेश आला आणि ते कर्तव्यावर रूजू झाले. अशातच शुक्रवारी सचिन जाधव यांना वीरमरण आल्याची बातमी सकाळी स्थानिक प्रशासनाने दिली. दुसाळे गावच्या सुपूत्राला वीरमरण आले, या बातमीवर ग्रामस्थ आणि सचिनच्या मित्रांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. सीमेवर घुसखोरी करणार्या चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
दोन महिन्यांची रजा मिळाल्यानंतर सचिन जाधव हे महिनाभरापुर्वी गावी आले होते. सीमेवरील तणाव वाढल्यानंतर उर्वरीत रजा रद्द झाली आणि त्यांना तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचा आदेश आला. त्यानुसार सचिन जाधव पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून लेह-लडाख सीमेवर भारत-चीनमध्ये तणावाची परिस्थिती आहे. गलवान खोर्यासह लेह-लडाख सीमेवर चिनी सैनिकांची आगळीक सुरू आहे. चिनी सैनिकांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडताना झालेल्या चकमकीत सचिन जाधव यांना वीरमरण आले.
सचिन जाधव यांचे दुसाळे गाव हे पाटण तालुक्यातील तारळेपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांना वीरमरण आल्याची बातमी तारळे, दुसाळे येथे समजताच संपुर्ण तारळे परिसर शोकसागरात बुडाला. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. गावोगाव श्रध्दांजलीचे बॅनर लावण्यात आले. त्यांचे मित्र शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊ लागले. सोशल मीडियावरही सचिन जाधव यांच्या सैन्य दलातील कामगिरीच्या आठवणी शेअर होऊ लागल्या.
सचिन जाधव यांचे प्राथमिक शिक्षण दुसाळे गावात झाले. सातारा येथे उच्च शिक्षण घेत असताना 2002 साली ते पुणे येथे सैन्य दलात भरती झाले. सध्या ते 111 इंजिनिअरींग रेजिमेंटमध्ये नाईक पदावर कार्यरत होते. त्यांनी लेह लडाख, जम्मू काश्मीर, पुणे येथे सेवा बजावली होती. सध्या त्यांची पोस्टिंग लेह-लडाख सीमेवर होती.
सचिन जाधव यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेचा वारसा आहे. त्यांचे वडील संभाजी जाधव हे सुध्दा सैन्यात होते. वीस वर्षापूर्वी मेजर सुभेदार पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच सचिन यांचा लहान भाऊ दहा वर्षापूर्वी देश सेवेत रूजू झाला आहे. सचिन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि दोन विवाहित बहिणी, असा असा परिवार आहे.
मुलाला वीरमरण आल्याची माहिती कुटुंबीयांना समजताच वीर पिता आणि वीरमातेने हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. सचिन यांच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली. यापुर्वी पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील जवान गजानन मोरे यांना कारगिल युध्दात वीरमरण झाले होते. त्यानंतर दुसाळेतील जवान सचिन जाधव यांच्या रूपाने पाटण तालुक्याचा आणखी एक सुपूत्र सीमेवर देशासाठी हुतात्मा झाला आहे.