सातारा - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी यांच्यात काटे की टक्कर पहायला मिळाली. कोरेगाव तालुक्यात काही ग्रामपंचायतींवर शिवसेनेने राष्ट्रवादीची सत्ता खेचत भगवा फडकवला. तर सातारा तालुक्यात भाजपच्या दोन्हीं राजेगटात रस्सीखेच पहायला मिळत आहे. वाईत राष्ट्रवादी पुन्हा... ही ट्युन जोरकसपणे ऐकायला मिळाली. अनेक गावात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत दोन गटात व स्थानिक विकास आघाड्यांत लढत पहायला मिळाली.
654 ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार -
जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक होती. पैकी 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींमध्ये शनिवारी मतदान झाले. आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील चित्र स्पष्ट झाले. ग्रामीण पातळीवर स्थानिक पॅनेलच्या माध्यमातून निवडणुक लढविली गेली. तथापि या ग्रामपंचायतींवर आपलेच पॅनेल आल्याचा परस्पर विरोधी दावा कोरेगावसह जिल्ह्याच्या इतर तालुक्यांत लोकप्रतिनिधींनी केल्याचा विरोधाभास पहायला मिळाला.
वाईत राष्ट्रवादीचेच वचस्व -
वाई तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायती जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले.तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावागावातील दोन गटात व स्थानिक ग्राम अघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढविल्या गेल्या होत्या. तालुक्यातील ओझर्डे ग्रामपंचायत भाजपाने जिंकत सत्तांतर घडवून आणले. वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी. व्ही. काळे व विश्वजित पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत बहुमताने ग्रामपंचायत मिळवली.बावधन ग्रामपंचयत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली.भाजपा, शिवसेना व स्थानिकांच्या आघाडीने निकराची लढत दिली. पसरणी स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले तर विरमाडे आणि धोम ग्रामपंचयतींमध्ये भाजपने विजय मिळविला. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी परखंदी ग्रामपंचायत कायम राखली. तालुक्यात ५७ ग्रामपंचयतींमध्ये मतदान झाले. त्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकत आपला वर्चस्व कायम राखले. यामध्ये शेंदुरजणे, गुळुंब, मेणवली, सुरुर, चांदक, पांडेवाडी, मोहडेकरवाडी, आसरे, रेनावळे, लोहारे, आसले, खानापूर, व्याजवाडी, उडतारे, बेलमाची, कडेगाव आदी ग्रामपंचयतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली. केंजळ व गुळूंब मध्ये सत्तांतर झाले व येथे राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली.
सातारा-जावळीत राजेगटांचाच दबदबा -
आज सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. वेगवेगळ्या तालुक्यातील निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीला भाजपाने जोरदार टक्कर दिली. आठ विधानसभा मतदार संघाचे चित्र दुपारी हाती आले. सातारा व जावळी तालुक्यावर भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे व खासदार उदयनराजे या दोनच गटांचे वचस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठा अधोरेखित -
पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, माणचे प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, मकरंद पाटील यांनी मेहनत घेतल्याने ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राष्ट्रवादीला राखता आले. वाईमध्ये आमदार मकरंद पाटील यांनी भाजपाला डोके वर काढू दिले नाही. सातारा जावलीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,माणमध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे, कोरेगावामध्ये आमदार महेश शिंदे, पाटण मध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही आपले वर्चस्व कायम राखले. कोरेगाव खटाव मध्ये आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार लढत झाली. सेनेच्या आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना धक्का देत कोरेगाव मध्ये वर्चस्व मिळविले तर खटाव,कोरेगाव मतदार संघातील सातारा तालुक्यात शशिकांत शिंदे यांनी प्राबल्य राखले.
दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का -
कराड दक्षिण मतदार संघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा भाजपाचे डॉ. अतुल भोसले, भाजपाचे विक्रम पावस्कर यांनी तब्बल २९ ग्रामपंचायती खेचून आणत पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का दिला. फलटण तालुक्यात भाजपच्या दिग्गजांनी लक्ष घालूनही राजे गटाने ही निवडणूक एकतर्फी ठरविली. पाटणमध्ये पारंपारिक लढती देसाई आणि पाटणकर गट अशा झाल्या असल्या त्यातही भाजपाने आपले अस्तित्व काही दाखवून दिले. सातारा जावली तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व खासदार उदयनराजे यांनाही ग्रामपंचायतीत यश मिळाले असले तरी खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटांचाच दबदबा पहायला मिळत आहे.