सातारा Satara News : साताऱ्यातील महामार्गावर डॉल्बीवाल्यांनी गुरुवारी (30 नोव्हेंबर) रात्री मोठा धिंगाणा घातला. त्यात दोन डॉल्बीधारक आपापली समर्थक मुलं आणि सिस्टीम घेऊन महामार्गावर जमले. त्यानंतर दोघांनी आपापल्या डॉल्बीचा मोठ्यानं आवाज करून समर्थकांसह धिंगाणा सुरू केला. या वेळी नाचताना दोन्ही गटांकडून पिस्तूल, तलवारी, कोयते अशी धारदार शस्त्रे नाचवण्यात आली. या घटनांमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली. तसंच घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेत बंदुका, तलवारी आणि कोयते घेऊन नाचणाऱ्या संशयित सहा जणांना तत्काळ अटक केली, तर 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयित आरोपींचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी सुरू केली धरपकड : सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या आवाजात डॉल्बी लावून शस्त्रे नाचवल्या प्रकरणी 33 जणांवर सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. तसंच या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही तरुण घातक शस्त्र हातात घेऊन नाचत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय.
डॉल्बीच्या आवाजाची स्पर्धा : तुझ्या डॉल्बीचा आवाज मोठा की माझ्या, यावरून लिंब (ता. सातारा) येथील दोन डॉल्बी मालकांमध्ये सोशल मीडियावर खडाजंगी झाली होती. त्यानंतर दोघांनी समोरासमोर येऊन डॉल्बी वाजवण्याचं आव्हान दिलं गेलं. आपल्या समर्थकांना मेसेज करून दोन्ही डॉल्बी गाैरीशंकर काॅलेजच्या परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर आले. त्यानंतर दोघांमध्ये डॉल्बी स्पर्धेला सुरुवात झाली अन् डॉल्बीच्या ठेक्यावर अनेक जण चक्क बंदुका, तलवारी आणि कोयता हातात घेऊन नाचू लागले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सुमारे 33 जणांवर शस्त्रबंदी कायदा, बेकायदा जमाव जमवणे आणि विनापरवाना सिस्टीम लावणे अशा कलमांनुसार सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच या घटनेचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.
हेही वाचा -
- Satara Crime News: तीन राज्यात घरफोड्या करणारी केटीएम गॅंग जेरबंद; गुजरातमध्ये गहाण ठेवलेले १०३ तोळे सोने, ६ किलो चांदी हस्तगत
- धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर; खंबाटकी घाटात आज 'रास्ता रोको', जमावबंदी आदेश लागू
- Satara Double Murder : दुहेरी हत्याकांडानं सातारा हादरलं! शेतात पाणी द्यायला गेलेल्या दाम्पत्याची निर्घृण हत्या