सातारा - देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सगळीकडे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होत आहे. मात्र, पाटण शहरातील एका युवकाने वाढदिवसानिमित गोरगरिबांना मदत वाटप केली म्हणून पाटण पोलीस स्टेशनमध्ये त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. विशेषता यावेळी सोशल डिस्टनिंगची ऐशी-तैशी करण्यात आल्याने पोलिसांनीच कायदा पायदळी तुडवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचारी याना हे प्रकरण चांगलेच भोवनार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
कोरोनाच्या संकटसमयी सगळीकडेच पोलिसांचे काम चांगले सुरू आहे. मात्र अशा एका चुकीच्या गोष्टीमुळे पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या कामावर पाणी फिरल्यासारखे आहे. पाचपेक्षा जादा संख्या या वाढदिवसाला उपस्थित असल्याचे या फोटोत दिसते मग येथे कोरोना संचारबंदीचे उल्लंघन होत नाही का.?
कोरोना व्हायरस हे संकट संपूर्ण देशासह महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले आहे. आशा परस्थितीत प्रशासना बरोबर पोलिस यंत्रणेचे काम वाखाणण्याजोगे आहे. पाटण पोलिसांच्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक देखील होत आहे. मात्र पोलिसांच्या या कामाचे अनेकजण गैरफायदा घेताना दिसत आहेत. स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणारे फोटोसेशन व प्रसिध्दीसाठी एक- दोन गरीब कुटुंबांना धान्य वाटप करुन गरीबीचे दिंधवडे सोशल मीडियावर काढत आहेत. मोठे कार्य केले म्हणून स्वतःचा वाढदिवस संचारबंदीत चक्क पोलिस स्टेशनमध्ये केक कापून व एक - दुसऱ्याला भरवून साजरा करत आहेत. हा वाढदिवस साजरा करताना संचारबंदीचे उल्लंघन आपणाकडून होते का नाही याचे भान देखील यांना राहत नाही हे विशेष.
दुसरीकडे पाच पेक्षा जादा नागरिक एकत्र दिसले की पोलिसांकडून संचारबंदीचे उल्लंघन प्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जाते. मंगळवारी ऐकाच दिवशी पाटण पोलिसांनी १७ महिलां व १७ पुरुष अशा ३४ जणावर संचारबंदी उल्लंघन प्रकरणी एकाच वेळी कारवाई केली. या कारवाईचे सगळीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे पाटण पोलिस स्टेशनमध्ये स्वयघोषित समाजसेवकाचा एकत्रित वाढदिवस साजरा होतो. त्याचे फोटो व्हायरल होतात याचे आश्चर्य व्यक्त केले जात असून आता यांच्यावर कोण कारवाई करणार? अशी चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.