सातारा- जिल्ह्यातील गंभीर दुष्काळ जाहीर झालेल्या भागात पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली आहे. माण-खटाव तालुक्यातील दहिवडी, म्हसवड, मलवडी, मार्डी या ठिकाणी तर खटाव तालुक्यातील वडूज, कातरखटाव, औंध परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. तसेच महाबळेश्वर, व कोयना परिसरात देखील संततधार सुरू आहे. सातारा शहरात चार दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा आला आहे. फलटण, लोणंद परिसरात तुरळक व जोरदार असा पावसाने रात्री हजेरी लावली आहे.
तर जिल्ह्यातील कोरेगावच्या काही भागात तुरळक पाऊस झाला आहे. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. अनेक ओढे, नाले भरून वाहिले आहेत. अशाच अनेक मोठ्या पावसाची या दुष्काळी भागाला गरज आहे. खरीप हंगामातील मशागत आणि पेरणीच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. मात्र पाऊस आठ ते दहा दिवस गायब झाल्याने मोठे संकट उभे राहिले होते. मात्र रात्री पावसाने हजेरी लावून शेतकरी वर्गाला थोडा दिलास दिला आहे. बाजरीच्या पिकांना या पावसाने चांगलाच फायदा होणार आहे.
अचानक मागच्या आठवड्यात गायब झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पश्चिम भागात पुन्हा दमदार आगमन केल्यामुळे मान्सून पर्यटनास सुरुवात झाली आहे. पावसाच्या सरीवर सरी महाबळेश्वर, कास, ठोसेघर, कोयना परिसरात जोरदार कोसळत असल्याने सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कास धरण, महाबळेश्वरला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरले आहेत. तसेच जिल्ह्यातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यातील ठोसेघर व कोयना परिसराच्या सौंदर्यात भर पडत आहे.