कराड (सातारा) - पाटणसह कराड तालुक्यात शनिवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी धरणाचे चार दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले. तसेच धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे धरणातून ८ हजार ४७४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत असून कोयना, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाटण तालुक्यातील साकव, पूल पाण्याखाली गेले आहेत.
हेही वाचा - भोसले मंडळींना भ्रष्टाचाराचा पैसा स्वस्थ बसू देईना; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
मुसळधार पावसामुळे कोयना आणि केरा नदी दुथडी भरून वाहत आहे. ओढ्यांवरील साकव पुलांवर पाणी आल्याने ग्रामीण भागातील वाहतूक कोलमडली आहे. तसेच नद्या, ओढे-नाल्यांना पाणी आल्याने दुर्गम भागात मतदान यंत्रे घेऊन जाणार्या कर्मचार्यांची वाहने अडकून पडली होती. कोयना धरणातील पाणीसाठा १०५.१४ टीएमसी झाला आहे. धरणात १२ हजार १३१ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचा पायथा वीजगृह सुरू करण्यात आला आहे.
पावसामुळे सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आगाप पेरणी केलेले भात पीक काढणीला आले असून पावसामुळे भातालाही फटका बसला आहे. पाटण-मूळगाव रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. नजीकच्याच कळके वस्तीतील घरांमध्येही पाणी शिरले आहे. पाटण तालुक्यातील दाढोली पूलही पाण्याखाली गेला आहे. पाटण ते मूळगाव रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर लगत असलेल्या कळके वस्तीत पाणी शिरल्याने अनेकांच्या घरात पाणी गेले आहे. दाढोली येथील पूल देखील पाण्याखाली गेला आहे.
हेही वाचा - उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट देण्यात चूक झाली, भर पावसात पवार बरसले
पाटण तहसील कार्यालयात मतदानाचे साहित्य घेण्यासाठी वाहने पावसामुळे वेळेवर पोहचू शकली नाहीत. त्यामुळे साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासही वाहनांना विलंब झाला. शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन गारठले आहे. कराड तालुक्यातही परतीच्या पावसाने दैना केली आहे. कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कराडच्या कृष्णा नदीचे वाळवंट पाण्याखाली गेले आहे. कराड शहरातील सखल भागात पाण्याची तळी साचली आहेत. कराड तालुक्यात सगळीकडेच जोरदार पाऊस कोसळत आहे. ऐन सुगीच्या हंगामात परतीच्या पावसाने दणका दिल्याने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.