कराड (सातारा) - कराडमध्ये वादळी वाऱ्यासह काल (बुधवारी) दुपारी पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊण तास कराडसह परिसरात जोरदार पाऊस झाला. शेतातील काही कामे सुरू असल्याने अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यासह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
हेही वाचा- #coronavirus : मुंबईतील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
बुधवारी सकाळपासून कराडमध्ये कडक ऊन होते. दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात ढगांची दाटी झाली. वादळी वारे सुटले आणि ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास वादळी वाऱ्यासह पावसाने कराडसह परिसराला झोडपले. एप्रिल महिन्यातील कडाकाच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वादळी पावसामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. नांगरुन टाकलेल्या शेतातील कामांना या पावसामुळे आता गती मिळेल.