कराड (सातारा) - जिल्ह्यात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये मालमत्तेसह पिकांचे नुकसान झाले आहे. कराडमधील सूर्यवंशी मळ्यात घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच ग्रामीण भागातील उसाचे पीक भुईसपाट झाले आहे. झाडांच्या फांद्या पडूनही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले आहेत.
कराडमध्ये तासाभरात ५७ मि. मी. पाऊस -
कराड तालुक्यात एकूण १३ महसुली मंडळ आहेत. यापैकी कराडमध्ये तासाभरातच तब्बल ५७ मि. मी. पाऊस झाला. याशिवाय शेणोली 62, कवठे 60, मलकापूर, काले आणि उंडाळे 55, सुपने 54, कोळे 52, उंब्रज 47, मसूर 46, सैदापूर 45, कोपर्डे हवेली 43 आणि इंदोलीत 35 मि. मी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच रविवारी दिवसभरात कराड तालुक्यात सरासरी 51 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदा 687.46 च्या सरासरीने आतापर्यंत 8937 मि. मी. पाऊस झाला आहे.