कराड (सातारा) - सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
गेले काही दिवस सर्वत्र परतीचा पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीने काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्याच्या सर्वच भागात गेल्या दोन- तीन दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतातील सोयाबीन, भात, ज्वारीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पीक नुकसानीसह, रस्ते, छोटे पूल व पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले. त्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
संयुक्त पंचनामे करुन ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबात बाधित शेतकऱ्यांना १३ मे २०१५ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेला एकत्रित प्रस्ताव प्रपत्र अ, ब, क, ड मध्ये अहवाल सादर करावा. येणाऱ्या प्रस्तावामध्ये एकाच लाभार्थ्यासाठी मदतीची द्विरुक्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवायचा असल्याने अहवाल पंचनामे तत्काळ सादर करावेत, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व तहसीलदारांना सुचित केले आहे.