सातारा : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्मशान शांतता पसरली. कर्जत जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांचा निसटता विजय झाला. आज कराड इथं प्रिती संगमावर रोहित पवार आणि त्यांचे काका अजित पवार हे एकमेकांसमोर आले. यावेळी काका पुतण्याचं कराडला 'प्रीतीसंगम' इथं भेट झाली. काका पुतण्याच्या या 'प्रीती-संगमा'नं मात्र मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.
कराडला काका पुतण्याचं 'प्रीतीसंगम' : आज कराड इथं यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळीच 'प्रीतीसंगमा'वर दाखल झाले. तर आमदार रोहित पवार यांनीही यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी प्रिती संगमावर हजेरी लावली. प्रीतीसंगमावर काका अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार हे एकमेकांच्या समोरासमोर आलं. यावेळी काका अजित पवार यांनी पुतण्या रोहित पवार यांना दर्शन घे माझं असं ठणकावलं. रोहित पवार यांनीही काका अजित पवार यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर काका अजित पवार यांनी 'ए ढाण्या, तू थोडक्यात वाचलास, माझी एखादी सभा झाली असती, तर . . .' असा मिश्किल टोमणा रोहित पवार यांना लगावला. त्यामुळे प्रीती संगमावर मोठा हशा पिकला. त्यानंतर अजित पवार बेस्ट ऑफ लक म्हणाले, मग रोहित पवार यांनीही हसत हसत तिथून काढता पाय घेतला.
अजित पवार म्हणाले, 'शरद पवार आले असते तर . . .' : प्रीतीसंगमावर आमदार रोहित पवार यांनी दर्शन घेतल्यानंतर काका अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं. माझे काका शरद पवार हे आले असते, तर मी देखील त्यांचं दर्शन घेतलं असतं, असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे काका पुतण्यात कराडला चांगलंच प्रीतीसंगम रंगल्याचं दिसून आलं. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चुकवलेल्या 'टायमींग'बाबत प्रीती संगमावर मोठी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा :