सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपानं सातारा आणि जावळीत आपली घोडदौड कायम ठेवली आहे. पाटणमध्ये शिंदे समर्थक शंभूराज देसाई गटानं सत्तांतराचे फटाके फोडले. वाईमध्ये अजितदादा गट तर कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाला सत्ता अबाधित राखण्यात यश मिळालं आहे. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रभामुळं कॉंग्रेसचं पारडे जड राहिलं.
सातारा-जावलीत भाजपाची बाजी : सातारा आणि जावली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसंच पोटनिवडणुकीत भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाची घोडदौड पाहायला मिळाली. सर्वच ग्रामपंचायतीवर शिवेंद्रराजेंच्या गटानं वर्चस्व मिळविलं. जावली तालुक्यातील एकूण २४ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्या सर्व ग्रामपंचायती आ. शिवेंद्रराजेंचे नेतृत्व मानणाऱ्या आहेत. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये शिवेंद्रराजे गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली.
पाटणमध्ये फुटले सत्तांतराचे फटाके : पाटण तालुक्यातील निवडणुकीच्या निकालात उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटानं ८ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडवत शरद पवार समर्थक पाटणकर गटाला धक्का दिला. दुसरीकडे रुवले ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी आणि गाढखोपमध्ये महाविकास आघाडीनं मंत्री शंभूराज देसाई गटाच्या पॅनेलचा पराभव केला. काँग्रेसला केवळ एका ग्रामपंचायतीत यश मिळाले. बिनविरोध आणि निवडणूक झालेल्या एकूण २० ग्रामपंचायतींवर शंभूराज देसाई गटानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
कराड उत्तरेत शरद पवार गटाचा डंका : कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सर्व ८ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा रोवला. आमदार बाळासाहेब पाटील समर्थकांनी निर्विवाद यश मिळवत भाजपाला धोबीपछाड दिला. शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांना त्यांच्याच गावात शरद पवार गटाने मात दिली.
कराड दक्षिणमध्ये कॉंग्रेसचा वरचष्मा : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ४ ग्रामपंचायतींपैकी ३ ग्रामपंचायतींवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाकांचा पाटील-उंडाळकर गटानं सत्ता कायम ठेवत भाजपाला झटका दिला. भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले यांना फक्त रेठरे बुद्रुक या स्वतःच्या गावात सत्ता राखण्यात यश आलं.
वाईत राष्ट्रवादी, माणमध्ये भाजपा तर फलटणमध्ये टाय : माण तालुक्यातील अवघ्या ४ ग्रामपंचायतींची निवडणूक लागलेली होती. या ग्रामपंचायतींच्या निकालात भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचं वर्चस्व दिसून आलं. चारही ग्रामपंचायतीची सत्ता गोरे गटानं ताब्यात ठेवली. वाई तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये अजित पवार गटाच्या आमदार मकरंद पाटील यांचं वर्चस्व पाहायला मिळालं. तर फलटण तालुक्यात रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटाला प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींची सत्ता मिळाली.