कराड (सातारा) : 'ज्याचा माल, त्याचा हमाल' या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माल वाहतुकदारांनी 31 ऑगस्टपर्यंत माल वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कराडमध्ये झालेल्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र मालट्रक वाहतूकदार आणि ट्रान्सपोर्ट संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कराडमध्ये माल वाहतुकदारांचा मेळावा झाला. मेळाव्यास पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील माल ट्रक वाहतूकदार आणि ट्रान्सपोर्ट मालक उपस्थित होते.
माल वाहतूक व्यवसाय अडचणीत
सध्या माल वाहतूक व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यातच माल वाहतूकदारांना हमाली द्यावी लागत आहे. त्यामुळे माल वाहतुकदारांना आर्थिक फटका बसत आहे, अशा भावना मेळाव्यात माल वाहतुकदारांनी व्यक्त केल्या.
31 ऑगस्टपर्यंत माल वाहतूक बंद
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार हमाली वराई ज्याचा माल असेल त्यांनीच द्यायची आहे. परंतु, व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती वाहन मालकांकडून हमाली वसूल करत आहेत. याच अनुषंगाने कराडमध्ये मेळावा आयोजित करून व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समितींना वाहन मालकांनी हमाली वराई न देण्याचा निर्णय घेतला. तसेच 31 ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू