कराड (सातारा) - सैदापूरमधील रेणुकानगरमध्ये घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील चोरलेले गंठण आणि मंगळसूत्र विकण्यासाठी आलेल्या आरोपीला कराड शहर पोलिसांनी सापळा रचून ओगलेवाडी (ता. कराड) येथील मंडईत पकडले. शितल गोरख काळे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा 1 लाख 15 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सैदापूरमधील रेणुकानगरमध्ये राहणारी फिर्यादी महिला शनिवारी (दि. 24 एप्रिल) घरात झोपली असताना आरोपीने पाठीमागील दाराने घरात घुसून त्यांच्या गळ्यातील गंठण आणि मंगळसूत्र चोरून नेले होते. यासंदर्भातील गुन्हा कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी चोरीचे दागिने विकण्यासाठी ओगलेवाडी मंडईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ओगलेवाडी मंडईत सापळा लावला होता. दागिने विकण्यासाठी आलेला संशयीत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 लाख 15 हजार रूपये किंमतीचे तीन तोळ्याचे दागिने सापडले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.