सातारा - गोवा मुक्ती संग्राम लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मानाने गौरविण्यात आलेले सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक रावसाहेब अनंत घार्गे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
खटाव तालुक्यातील वडगाव (जयराम स्वामी) हे त्यांचे मूळ गाव होते. २५ जुलै १९३४ रोजी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गोवा मुक्ती लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर ते पोलीस दलात भरती झाले. १९५९ ते १९९२ अशी ३३ वर्षे त्यांनी पोलीस दलात सेवा केली. अप्पर पोलीस अधीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. २०१५ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विशेष सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले होते. सेवानिवृनीनंतर २७ वर्ष वडगावमधील हुतात्मा मंडळाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा - कराडमधील गुंडांची टोळी सातारा, सांगली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार