सातारा- शाहूपुरी भागात रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास 4 गव्यांनी दर्शन दिल्याने बंदिबस्तासाठी असलेल्या पोलीस व नागरिकांची काही काळ पळापळ झाली. या धामधूमीत होमगार्ड जखमी झाला आहे.
रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नेहमी गजबजलेला शाहूपुरी चौक लाॅकडाऊनमुळे सुमसान आहे. काही तुरळक लोक रस्त्यावर होते. पेट्रोल पंपाजवळ एक गवा लोकांच्या दिशेने धावत आल्याने रस्त्यावरीळ माणसांची बांबेरी उडाली. गव्याला पाहून बंदोबस्तावरील पोलीस व होमगार्डनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. या धामधुमीत होमगार्ड अक्षय शिंगरे यांच्या पायाला व डोक्याला मुकामार लागला.
हा गवा अंबेदरे रस्त्यावर स्वामीसमर्थ मंदिराच्या दिशेने निघून गेला. एकूण 4 गव्यांचा कळप होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तर काही जण हा एकच गवा असून तो सैदापूर, खेड असा फिरत शाहूपुरीत आला असावा, असे सांगतात.
वनक्षेत्रपाल शितल राठोड व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहाय्यभूत उपक्रमाचा भाग म्हणून स्थापन केलेल्या सातारा दक्षता पथकाच्या शाहूपुरीतील सदस्यांनी वनविभागाला मोलाचे सहकार्य केले.
दाट वस्ती सोडून निर्जन स्थळाच्या दिशेने गवे निघून गेले आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कोणत्याही कारणाने घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शितल राठोड यांनी केले.
दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वरच्या तपासणी नाक्यावर भर दुपारी गव्यांचा कळप दृष्टीस पडला होता. साताऱ्यातील मोरे काॅलनीत वनविभागाला जखमी बेकर आढळले होते. अभावानेच दिसणारे वानरांचे कळपही शहरात पहायला मिळू लागले आहेत. पाण्याची कमतरता, डोंगरांना लागणारे वणवे यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे येत आहेत. लाॅकडाऊनमुळे त्यांची फसगत होत असावी, असे मत रानवाटा पर्यावरण मंडळाचे सचिव विशाल देशपांडे यांनी मांडले.