कराड (सातारा) - संततधार पावसामुळे गुरूवारी (22 जुलै) सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर पाणीसाठा 72.88 टीएमसी झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथ्याशी वीजगृह कार्यान्वित करण्यात आला असून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने उद्या (दि. 23 जुलै 2021) रोजी सकाळी 8 वाजता धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 25000 क्युसेक इतका करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पावसाची संततधार आणि कोयनेच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना परिसरातील अन्य उपनद्याही तुडूंब भरून वाहत आहेत. या नद्या कोयना नदीला मिळतात. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोयना परिसरातील काफना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीच्या पुराचे पाणी कराड-चिपळूण मार्गावर आल्यामुळे कोकणातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कराड, पाटणमार्गे चिपळूणकडे जाणारी वाहतूक केव्हाही बंद होऊ शकते. काल (बुधवारी) रात्री नेचल-हेळवाक रस्त्यावर पाणी आल्यामुळे चिपळूण मार्ग ठप्प झाले होते. पाण्यात फसलेली एक कार स्थानिकांनी पाण्यातून बाहेर ओढून काढली. कारमधील प्रवासी जीव वाचविण्यासाठी झाडावर बसले होते. रात्री उशीरा स्थानिक नागरिकांनी त्यांची सुटका केली. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
12 तासात कोयनेच्या पाणीसाठ्यात 10 टीएमसीने वाढ
मागील 12 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 10 टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाची पाणी पातळी तब्बल 7 फूट 5 इंचाने वाढली आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले-ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. ओढ्या-नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले आहे. पाटणचे बसस्थानक देखील जलमय झाले आहे. पाटण बसस्थानकाबाहेरील कराड-कोयनानगर मार्गावर देखील पाणी असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यामुळे पाटणमधील रस्त्यानजीकच्या व्यावसायिकांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरूवात केली आहे.
कराड तालुक्यातही रात्रभर पावसाची संततधार
कराड तालुक्यात बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस अजून थांबलेला नाही. रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांमधील पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. पावसाचा जोर आणि कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दोन्ही नद्यांच्या काठावरील गावांना पुराचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे.
कराड तालुक्यात 83 मिलीमीटर पावसाची नोंद
कराड तालुक्यातही पावसाचा जोर आहे. बोचरे वारे आणि संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस अजून थांबलेला नाही. पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. तसेच ओढे-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. कराड तालुक्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 83.53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुपने मंडलमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. पावसामुळे कोयना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली असून पुराचा धोका निर्माण झाला आहे.
सातारा जिल्ह्यात सरासरी 76 मि.मी. पाऊस
सातारा जिल्ह्यात बुधवारी दिवसभरापासून ते गुरुवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी 76.2, तर आतापर्यंत सरासरी 196.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात गुरूवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सातारा - 100.6, जावळी - 140.2, पाटण - 132.9, कराड - 81.4, कोरेगाव - 50.2, खटाव - 37.3, माण - 8.1, फलटण - 4.7, खंडाळा - 23.7, वाई - 112.4 आणि महाबळेश्वर - 198.3 मिलीमीटर पाऊसाची झाली आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात आज सकाळी 8 वाजेपर्यंत विक्रमी पाऊस झाला आहे. कोयनानगर येथे 347 मिलीमीटर, नवजा येथे 427 आणि महाबळेश्वरमध्ये 424 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उच्चांकी पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच पाणीसाठ्यातही विक्रमी वाढ झाली. 12 तासामध्ये कोयना धरणात तब्बल 10 टीएमसीने वाढ झाली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद 2 लाख क्युसेकहून अधिक झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थितीचा धोका वाढणार आहे.
...तर कोणत्याही क्षणी कोयनेचे दरवाजे उघडणार
कोयना धरणातील पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणाच्या सांडवा पातळीपर्यंत पाण्याची पातळी वाढल्यास धरणाचे वक्र दरवाजे उघडून कोयना नदीपात्रात विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा -Konkan Rain : यंत्रणांनी सतर्क राहून बचावकार्य करावे; पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा