सातारा - माण तालुक्यातील लोणार खडकी गावात डाळिंबाच्या शेतातून १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये किमतीची गांजाची रोपे जप्त केली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, म्हसवड पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी कुंडलिक निवृत्ती खांडेकर रा. लोणार खडकी, ता.माण या शेतकऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
डाळींबाच्या शेतात लागवड : डाळींबाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना खबऱ्याकडून मिळाली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा, म्हसवड पोलिसांनी संयुक्त छापा मारला. यावेळी शेतात गांजाची १ हजार ३३१ झाडे आढळून आली.
बाजारपेठेत एक कोटी किंमत : शेतातील गांजाची झाडे जप्त करून वजन केले असता ४२३.०२ किलो इतके वजन भरले. बाजारात या गांजाची किंमत १ कोटी ५ लाख ७५ हजार रूपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेत मालकास अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी सातारा जिल्ह्यातील आजपर्यतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई तीव्र : पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंमली पदार्थ विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. पोलीस निरीक्षक अरुण देवकर, म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्यासह संतोष पवार, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, विशाल भंडारे, अंमलदार अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिकें, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, स्वप्नील माने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, धीरज महाडीक, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, संभाजी साळूंखे, पंकज बेसके, राजीव कुंभार, अनिल खटावकर, रुद्रायन राऊत यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा - Bhiwandi Lok Sabha Constituency : शिंदे गटाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघात तयारी; शिंदे-भाजप येणार आमनेसामने?