सातारा - मेढा व वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय कामात अडथळा आणून दरोड्यासह वाळू तस्करी करणार्या 7 तरुणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 1 वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले. सर्व संशयित युवक जावळी, फलटण, खंडाळा, वाई या तालुक्यातील आहेत.
मयुर विकास जाधव (वय 24, रा. शेते), रोहित शंकर मोरे (वय 20, रा. गोपालपंताची वाडी), मंगेश चंद्रकांत शिर्के (वय 22, रा. म्हसवे), भूषण संभाजी भोईटे (वय 26, रा. विद्यानगर ता. फलटण), अकबर बाबूलाल बागवान (वय 42, रा. लोणंद ता. खंडाळा), संदीप किसन वाघ (वय 28, रा. अमृतवाडी), आकाश शिवाजी सावंत (वय 33, रा. चिंधवली दोघे ता. वाई) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. यातील मयुर जाधव हा टोळीप्रमुख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित टोळीच्या माध्यमातून वाळू चोरी करत होते. जावळी व कोरेगाव तालुक्यात संशयितांनी धुमाकूळ घालत वाळू चोरीसह, शासकीय कामात अडथळा तसेच दरोड्यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी संशयितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी दिली होती. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी भीतीचे वातावरण असल्यामुळे, त्यांच्याविरुध्द कठोर कारवाईची मागणी होत होती. भविष्यात त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी मेढा पोलिसांकडून तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो एसपी तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांच्या प्राधिकरणासमोर सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारी संशयितांना सातारा जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश काढण्यात आले.