सातारा : नवरा तुरुंगात असल्याने आर्थिक गरजेसाठी एका आईने पोटच्या मुलीची विक्री केली होती. मुलीला विकत घेतल्याचा आरोप असलेल्या महिलेला जामीन मंजूर करताना, 'मुलीला वस्तू मानून मुलीचा आर्थिक फायद्यासाठी वापर आक्षेपार्ह आहे. विक्री शब्द वापरतानाही अत्यंत वेदना होत आहेत', अशी टीपण्णी न्यायालयाने केली होती. त्याची गंभीर दखल घेत जामीन मिळालेल्या महिलेसह खासगी सावकारी करणाऱ्या टोळीला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण? साताऱ्यातील एका महिलेचा नवरा तुरूंगात असल्याने आर्थिक गरजेसाठी तिने पोटच्या मुलीची साताऱ्यातील खासगी सावकारांना विक्री करून पैसे घेतले होते. काही दिवसांनी तिने पैसे परत करून मुलीचा हक्क मागितला. मात्र, सावकारांनी तो नाकारला. महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सावकार दाम्पत्याने मुलीला तिच्या आईकडे सोपवले. याच गुन्ह्यातील जामिनासाठी सावकारी करणाऱ्या महिलेने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने तिला जामीन मंजूर न्यायालयाने गंभीर टीपण्णी केली.
सावकारांची टोळी तडीपार : सातारा शहर परिसरात सावकारी करणाऱ्या संजय बबन बाबर, अश्विनी संजय बाबर आणि संकेत दिनेश राजे (रा. सदरबझार, सातारा) या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केला होता. त्याला पोलीस अधीक्षकांनी मंजुरी दिली आहे.
तीन महिन्यांत नऊ जण तडीपार : साताऱ्याचे यापुर्वीचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या कार्यकाळात अनेक टोळ्या तडीपार करण्यात आल्या होत्या. सध्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तडीपारीचा तोच धडाका सुरू ठेवला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून ३ टोळ्यांमधील ९ जणांना तडीपार करण्यात आले आहे. लवकरच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची तसेच मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
सातारा खुनी हल्ला प्रकरण : कराडकर मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांना खुनी हल्ला केल्याप्रकरणी सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. टी. साखरे यांनी बाजीराव जगताप यांना 7 वर्ष सक्तमजुरी आणि 7 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. कराडमधील मारुतीबुवा कराडकर मठाच्या विश्वस्त तथा अध्यक्षाच्या डोक्यात विणा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी मठाचे तत्कालिन मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांना दोषी धरून कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. टी. साखरे यांनी सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.