सातारा (कराड) - येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या एका 54 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर कराड येथील कृष्णा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करताना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष पोषाख घातला होता.
कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्ग आणि मधुमेहामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वीच कृष्णा नदीकाठी दहनविधीच्या चौथऱ्याची बांधणी केली होती. शनिवारी सकाळी नगरपालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार केले. एका नातेवाईकाने मृताच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे स्वत: उपस्थित होते.