कराड (सातारा) - कराडच्या कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल दरम्यानच्या रस्त्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कराड शहरातील प्रमुख रस्त्याची सुधारणा केली जाणार आहे. यामुळे शहरांतर्गत दळणवळण सुकर होणार आहे.
कराड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील नवीन पूलाचे काम, पुलाशेजारील रखडलेल्या संरक्षक भिंतीचे काम, सैदापूर-ओगलेवाडी रस्त्याच्या बाजूला साचणाऱ्या पाण्याची समस्या, सुर्ली घाटातील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी खासदार पाटील हे पाठपुरावा करत आहेत. कराड-विटा मार्ग कराड शहरातून जातो. या मार्गावरील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूलापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात यावे, अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार कराड-विटा राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कृष्णा पुलाचे उर्वरीत काम लवकर पूर्ण करावे, यासह कृष्णा पुलाशेजारी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, कराड-ओगलेवाडी मार्गावर पावसाळ्यात वाचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्यात यावी, सुर्ली घाटातून जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी, यासाठीही खासदार श्रीनिवास पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे.