सातारा - जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी या ठिकाणी माणगंगा नदीत पोहताना ४ जण वाहून गेले. त्यापैकी ३ जण सापडले असून चौथ्या व्यक्तीचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. तुकाराम यादव खाडे असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. निवास साबळे, भीमराव नाकाडे, व संपत खाडे असे वाचलेल्या तिघांची नावे आहेत.
माण तालुक्यातील पळशी येथील तुकाराम खाडे, निवास साबळे, भीमराव नाकाडे व संपत खाडे हे ४ वर्गमित्र दीपावलीच्या सुट्टी निमित्ताने एकत्र आले होते. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता हे सर्व माणगंगा नदीवर असलेल्या पाटील वस्ती बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी बंधाऱ्यात पोहण्यासाठी उड्या मारल्या मात्र, पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्यांना पोहण्यासाठी अडथळा येत होता.
हेही वाचा - माणदेशातील ऐतिहासिक राजेवाडी तलाव भरला
दरम्यान बंधाऱ्यातून पडणाऱ्या पाण्याच्या भोवऱ्यात हे चारही जण सापडले. यामध्ये तीन मित्र हे एकमेकांना आधार देत भिंतीच्या कडेला आले. ग्रामस्थांनी त्यांना दोर आणि शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले. मात्र, तुकाराम खाडे हा पाण्यात वाहून गेला.
हेही वाचा - साताऱ्यात अशीही एक प्रथा, मेढरांना रंगरंगोटी करुन मिरवणूक
वाचवलेल्या ३ जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर तुकाराम यांचा शोध घेण्यासाठी नाकाडे वस्तीवरील मुलांनी हॅलोजन लाईट लावून शोध मोहीम सुरूच ठेवली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत तुकारामचा शोध लागू शकला नव्हता. त्यामुळे आपत्कालीन पथकास पाचारण करण्यात आले. आपत्कालीन पथक बुधवारी सकाळी येणार असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या सणावर घडलेल्या या घटनेमुळे पळशी गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - राज्यात नवे समीकरण...! काँग्रेसने दिले शिवसेनेबरोबर जाण्याचे संकेत?