सातारा - विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या खटाव येथील ट्रॅक्टर मालक ,चालकासह चौघांविरोधात औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चार ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. जायगाव ता. खटाव येथील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आठ लाख वीस हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अटक केलेल्या चार ही संशयित आरोपींना वडूज न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
कोरोना संसर्गाच्या काळातही मुजोर वाळू व्यावसायिकांकडून बेकायदा वाळू वाहतूक सुरू असल्याबद्दल खटाव तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांमध्ये खटाव येथील ट्रॅक्टर मालक शामराव मारुती पाटोळे, राजेश नवनाथ बोरगे , ट्रॅक्टर ड्रायव्हर विकास जगन्नाथ पाटोळे, किरण चंद्रकांत पाटोळे यांचा समावेश आहे.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास जायगाव ते भोसरे रस्त्यावर खटावकडून जायगावकडे बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती औंध पोलिसांना मिळाली. त्यानंतर चांबारकी नावच्या शिवाराजवळील रस्त्यावरून एचएमटी व न्यू हाँलंड ट्रॅक्टर ट्राॅलीमधून ही अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांनी छापा टाकल्यानंतर आढळून आले. औंध पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉल्या व दोन ब्रास वाळू असा सुमारे आठ लाख अठरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला तसेच वरील चारही आरोपींना अटक केली. ही कारवाई औंधचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.