सातारा - प्रतापगडावर सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने १८ वर्षांपासून शिवप्रताप दिन साजरा केला जातो. परंतु किल्ल्यावर अफजल खानाचा वध झाला ती शिवप्रतापाची जागा खुली करावी, अशी मागणी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक, माजी आमदार नितीन शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.
प्रेरणादायी भूमी
शासकीय विश्रामगृहात बोलताना ते म्हणाले, की स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी करून आणि हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी परतवून लावले. हा दिवस आपण शिवप्रतापदिन म्हणून अभिमानाने साजरा करतो. खानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा प्रताप आहे. या शिवप्रतापामुळे युवक, समाजामध्ये राष्ट्रीय विचार व दहशतवाद विरोधामध्ये लढण्याची प्रेरणा मिळते. परंतु हा परिसर बंदिस्त असल्यामुळे अफजल खान वधाची जागा, अफजल खान व सय्यद बंडाची कबर, शिवाजी महाराजांचा प्रताप शिवभक्तांना, युवकांना, नागरिकांना, राज्यातील व परदेशातील पर्यटकांना पाहता येत नाही.
परिसर करा खुला
प्रतापगडावरील हा प्रताप पाहून समाजात, युवकांमध्ये राष्ट्रीय विचार, दहशतवाद विरोधात लढण्याची प्रेरणा निर्माण होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची हुशारीची व युद्धनीतीचीही जाणीव होते. त्यामुळे वधाच्या ठिकाणाचा व कबरीचा परिसर तातडीने सर्वांना पाहण्यासाठी खुला करावा, असे नितीन शिंदे म्हणाले.
उदात्तीकरण थांबवण्याची मागणी
वधानंतर, मृत्यूनंतर वैर संपते या भावनेतून अफजल खान व सय्यद बंडाची बांधलेली कबर सर्वांना पाहणी करण्यासाठी खुली केल्याने कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वाटत नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुरू झालेले उदात्तीकरण शासनाने लक्ष घालून थांबवावे, या मागणीसाठी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्यावतीने मोठे शिवभक्तांचे आंदोलन उभे केले जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.