कराड (सातारा) - रानडुकराची शिकार करून मांसविक्री करणार्या तिघांना वनविभागाने हजारमाची (ता. कराड) येथे रंगेहात पकडले आहे. यादरम्यान एक जण वन कर्मचार्यांशी झटापट करून फरार झाला. शिकार केलेल्या रानडुकराचे विक्रीसाठी आणलेले 55 किलो मांस वनविभागाने यावेळी जप्त केले.
संशयित कराडमधील रहिवासी
या कारवाई वनविभागाने तिघांना अटक केली. सूर्यकांत निवास जाधव, अविनाश संपतराव पाटील आणि राजेंद्र रामचंद्र भोसले, अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ते अनुक्रमे हजारमाची, गोवारे आणि कराडमधील रहिवासी आहेत.
दुचाकी-चारचाकीसह तराजू, सुरे जप्त
रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी हजारमाची येथे आणले असल्याची माहिती वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य तथा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना खबर्यामार्फत मिळाली. त्यांनी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. भारतसिंह हाडा यांना घटनेची माहिती दिली. हाडा यांच्या आदेशानुसार वनपाल सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक अरुण सोळंकी यांच्या समवेत रोहन भाटे यांनी हजारमाची येथे धाड टाकली आणि मांसविक्री करणार्या तिघांना पकडले. अन्य एकजण कर्मचार्यांशी झटापट करून फरारी झाला. घटनास्थळावरून वन विभागाच्या कर्मचार्यांनी 8 मोटरसायकली आणि एक चारचाकी गाडी, डुकराचे 55 किलो मांस, तराजू, सुरे व चाकू, असे साहित्य जप्त केले.
वन्यजीव अपराध नियंत्रण समितीचे सदस्य तथा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार, वनक्षेत्रपाल ए. बी. गंबरे, वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक अरुण सोळंकी यांनी ही कारवाई केली.