सातारा - फलटण तालुक्यात डावी चळवळ वाढविणाऱ्या कार्यकर्त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील ( Krantisinh Nana Patil ) यांचा देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा फलटण येथे उभारला ( first replica statue of Krantisinh Nana Patil ) आहे. फलटण -पंढरपूर मार्गावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण १५ जानेवारी १९८२ रोजी झाले होते. पुतळा तयार करताना येडेमच्छिंद्र (या. वाळवा) येथील नानांच्या भगिनी आणि कराडचे ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी चेहरा तसेच शरीरयष्टीबद्दलची माहिती दिली होती. त्यावरून शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी दिमाखदार पुतळा तयार ( statue of Krantisinh Nana Patil ) केला.
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभारला पुतळा - स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सातारा जिल्ह्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगत असताना साताऱ्यातील अनेक गावांमध्ये त्यांचे वास्तव्य होते. तसेच स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि कामगारांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून नाना पाटील यांनी कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. साखरवाडी (ता. फलटण) येथील खंडकरी शेतकऱ्यांचा लढा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढला गेला होता. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फलटणकरांनी त्यांचा पुतळा उभारला.
क्रांतिसिंहांचा मतदार यादीत होता सातारचा पत्ता - सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी वास्तव्य केले होते. साताऱ्यातील कॉ. वसंतराव आंबेकर, माजी आमदार कॉ. व्ही. एन. पाटील, कॉ. नारायणराव माने, कॉ. वसंतराव आंबेकर यांच्या घरात ते राहत असत. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी उभे असताना मतदार यादीत क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पत्ता कॉ. वसंतराव आंबेकर यांच्याच घराचा होता.
घोषणानुसार वर्षभरात पुतळा देखील उभारला - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भरीव कामाबद्दल त्यांचा पुतळा उभारून कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय फलटणमधील डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतला. तशी घोषणा देखील करण्यात आली. त्यानुसार तातडीने कार्यवाही सुरू केली. क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा स्मारक समिती स्थापन करण्यात आली. सर्वांनी मिळून क्रांतिसिंह नाना पाटील यांचा देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा फलटणमध्ये उभा केला. याकामी फलटण तालुक्यातील खंडकरी शेतकरी, साखर कामगारांनीही सहकार्य केले. पुतळ्याचे शिल्पकार बी. आर. खेडकर होते तर पुण्याचे सुभाष चिंबळकर हे आर्किटेक्ट आणि माधवराव हिंगे यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहिले होते.
शेतकरी, कामगारांच्या उपस्थितीत पुतळ्याचे उद्घाटन - महाराष्ट्राचे गृह व पाटबंधारे खात्याचे तत्कालीन राज्यमंत्री अभयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुतळ्याच्या जागेचा भूमिपूजन समारंभ दि. २७ जून १९८१ रोजी झाला. त्यानंतर काही महिन्यातच क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा उभारण्यात आला. दि. १५ जानेवारी १९८२ रोजी फलटणचे माजी आमदार व कामगार नेते हरिभाऊ निंबाळकर यांच्या हस्ते आणि के. बी. तथा बबनराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली पुतळ्याचे अनावरण झाले. कामगार नेते कॉ. मधुकरराव भिसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास हजारो शेतकरी आणि कामगार उपस्थित होते.
रूंदीकरणातही पुतळा हटवू दिला नाही - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून फलटणकरांनी त्यांचा पुतळा उभारला. परंतु, मध्यंतरी पंढरपूर-फलटण मार्गाच्या रूंदीकरणात हा पुतळा हटवण्याबाबत चर्चा सुरू होती. परंतु, फलटणकरांनी कडाडून विरोध करत पुतळा हलवू दिला नाही. यावरून क्रांतिसिंहांबद्दल फलटणकरांना असलेला जिव्हाळा दिसून आला होता.
हेही वाचा - Supreme Court Hearing : लोकशाहीच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय व्हावं - घटनातज्ज्ञ उल्हास बापट