सातारा - प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सुत गिरणी पिंगळी बुद्रुक (ता. माण) येथे आज महाराष्ट्रातील पहिली शेळ्या-मेंढ्यांची चारा छावणी सुरू झाली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते या छावणीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जानकर म्हणाले, शेळ्या-मेंढ्यांच्या चारा छावणीची तरतूदच नव्हती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार ही तरतूद करण्यात आली. सध्याच्या सरकारमुळेच सातारा-पंढरपूर चारपदरी रस्ता, सातारचे वैद्यकीय महाविद्यालय होत आहे. म्हसवड, वडूज व दहिवडी येथे औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी लवकरच मंजूरी मिळेल, असे आश्वासनही त्यांनी जानकर यांनी दिले. माणला दुष्काळमुक्त करण्याचे काम आम्ही करणार आहोत, त्यासाठी पैसेही कमी पडू देणार नसल्याचे जानकर यांनी सांगितले.
यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले, माणमध्ये माणदेशी सुतगिरणीच्या माध्यमातून 20 व खटावमध्ये हरणाईच्या माध्यमातून 16 छावण्या सुरू आहेत. येळगावकर व देसाई यांनी टेंभूचे पाणी आणले. मात्र, गेल्या 10 वर्षामध्ये माणमध्ये इंजिनिअरींग कॉलेज काढू, कारखाने उभारु, असे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी साधे उसाचे गुर्हाळही सुरु केले नाही, अशी देशमुख यांनी विरोधकांवर केली.
यावेळी शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, माजी आमदार दिलीप येळगावकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर उपस्थित होते.